बेळगाव : वडगाव बाजार गल्ली येथे भाजी विक्रेते, हार विक्रेते, फळ विक्रेते तसेच दुकानदार यांनी रस्त्यात अतिक्रमण केले असून शहापूर, रयत गल्ली, वडगाव भागातील शेतकऱ्यांना आपल्या शिवारात बैलगाड्या तसेच गवताचे भारे घेवून ये- जा करणे त्रासाचे बनले आहे. याची दखल नुकताच रुजू झालेल्या मनपा आयुक्त शुभा बी. घेतील का? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. शुभा बी. या एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख बेळगाव शहरात निर्माण होत आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी नेमून दिलेले अधिकारी प्रत्येक वार्डमध्ये फिरून जातीनिशी समस्या जाणून घेऊन त्या सोडवत आहेत. त्यामुळे बेळगाव शहरातील नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
वडगाव बाजार गल्ली येथूनच रयत गल्ली आणि परिसरातील शेतकरी आपल्या बैलगाड्या तसेच गवताचे भारे घेऊन ये-जा करायचे. आता रस्ता रुंदीकरण होऊन देखील येथून शेतकऱ्यांना ये-जा करता येत नाही. इतका भाजी विक्रेत्यांनी रस्ता अतिक्रमण केला आहे. विष्णू गल्ली येथून येळ्ळूर रोडला बैलगाडी घेऊन शहापूर पर्यंत वडगाव येथील शेतकरी ये-जा करीत असतात. बाजार गल्लीत इतके अतिक्रमण झाले की दोन्ही बाजूने अर्ध्याहून अधिक रस्ता अतिक्रमण करून भाजी विक्रेते व फळ विक्रेते आपला व्यवसाय मांडून बसतात. त्यामुळे जनतेला देखील ये-जा करण्यास गैरसोयीचे होत आहे. मागील मनपा अधिकाऱ्याना देखील अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार निवेदने दिली होती. पण पाहणी करण्यात आल्यावर तात्पुरते अतिक्रमण हटविले जाते पुन्हा दुसऱ्या दिवशी भाजी विक्रेते येरे माझ्या मागल्या म्हटल्याप्रमाणे पुन्हा रस्ता अतिक्रमण करून आपला व्यापार चालू ठेवतात. त्यामुळे बाजार गल्लीतील अतिक्रमण हटवून मुख्य रस्ता मोकळा केल्यास तेथून ये-जा करणारे शेतकरी बैलगाड्या तसेच सामान्य नागरिकांना सोयीचे होईल. जर त्वरित अतिक्रमण हटविले नाही तर रयत गल्ली, वडगाव व शहापूर मधील शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह बाजार गल्लीत येऊन ठाण मांडून धरणे धरतील असा इशारा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.