
बेळगाव : जम्मू काश्मिरमधील पूंछ येथे झालेल्या अपघातात वीर शहीद झालेल्या सुभेदार दयानंद तिरकण्णावर यांच्यावर गुरुवारी (दि. २६) त्यांच्या मूळ गावी सांबरा लिंगायत स्मशानभूमीत शासकीय इतमामात, बंदुकीच्या फैरी झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद तिरकण्णावर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते. सांबरा ग्राम पंचायत, देवस्थान कमिटी, मराठी शाळा सुधारणा कमिटी, रक्षक माजी सैनिक संघटना, भावकेश्वरी माजी सैनिक संघटना, मुतगा, माजी सैनिक संघटना गोकाक, माजी सैनिक संघटना मुचंडी, माजी सैनिक संघटना मारीहाळ, सांबरा कुस्ती संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शहीद तिरकण्णावर यांचे अंतिम दर्शन घेताना गावातील प्रत्येक मार्गावर नागरिकांनी “वीर जवान अमर रहे, भारत माता की जय” अशा घोषणांनी त्यांना मानवंदना दिली. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना शहिद जवान तिरकण्णावर यांच्या पत्नीने सांगितले की, गेल्या वेळी गणेशोत्सवात आल्यावर त्यांनी मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. फेब्रुवारीमध्ये परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. गेल्या 25 वर्षांपासून ते भारतीय लष्करात कार्यरत होते. आणखी तीन वर्षांत 28 वर्षे सेवा पूर्ण करणार होते. अपघाताच्या दिवशी ते दुपारी फोनवर बोलले. मात्र, रात्री आठच्या सुमारास लष्कराने फोन करून अपघात झाल्याची माहिती दिली, असे सांगत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सुभेदार तिरकण्णावर यांचे प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी कन्नड शाळेत झाले. माध्यमिक व बारावी शिक्षण जनता विद्यालयातून पूर्ण केल्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीमधून ते सैन्यात भरती झाले होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलं वैष्णवी आणि गणेश असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta