बेळगाव : येथील बेळगाव जिल्हा अर्बन सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मराठा सहकारी बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मानद अध्यक्ष मल्लिकार्जुन चीनमुरी हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष श्री. बाळाप्पा कग्गनगी यांनी केले. चिनमुरी यांनी प्रास्ताविक केले. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन सर्व बँकांच्या नूतन संचालकांचे अभिनंदन केले.
असोसिएशन मध्ये जिल्ह्यातील ३८ बँका सदस्य असून या बँकांचे कामकाज अधिक चांगले व सक्षम होण्यासाठी असोसिएशन प्रयत्नशील आहे त्यासाठी संचालक, सीईओ व कर्मचारी यांच्याकरिता वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. याही पुढे आणखी काही सूचना असतील तर त्या कराव्यात असे आवाहन श्री. बाळाप्पा कग्गणगी यांनी केले.
गेल्या वर्षाच्या कारकिर्दीचा अहवाल सल्लागार श्री. मंजुनाथ शेठ यांनी सादर केला. त्यांनीच जमाखर्च, ताळेबंद पत्रक व पुढील अंदाज पत्रक सादर केले. त्याला सर्वांनुमते मंजुरी मिळाल्यानंतर सहसचिव प्रदीप ओऊळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी जिल्ह्यातील पाच बँकांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला. त्यामध्ये हुक्केरी अर्बन बँक, बेळगाव पायोनियर अर्बन बँक, दैवज्ञ सहकारी बँक, बैहोंगल अर्बन बँक व बेल्लद बागेवाडी अर्बन बँक या बँकांच्या अध्यक्षांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व फळांची करंडी भेट देऊन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी असोसिएशनचे सर्व संचालक तसेच सदस्य बँकांचे सभासद उपस्थित होते.
यावेळी पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड यांनी बँकिंग असोसिएशनच्या कार्याचा गौरव करून यापुढे अधिक प्रभावशाली काम करावे असे आवाहन केले. यावेळी झालेल्या चर्चेत बी ए भोजकर, एस एस पाटील, एस एस वाली, अमरनाथ महाजनशेट्टी वगैरेनी भाग घेतला.