बेळगाव : बेळगाव तालुक्यातील तारिहाळ गावात फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लहान मुलांसह वृद्ध आई – वडिलांना घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे.
पाच लाखांचे कर्ज घेतलेल्या गणपत लोहार यांच्या घरी आलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक घरावर जप्तीची कारवाई केली. यावेळी कुटुंबाला कोणत्याही वस्तूला हात लावण्याची परवानगी न देता, संसारोपयोगी सामान आणि गुरांसह कुटूंबियांना घराबाहेर काढले. गणपत लोहार यांनी पाच वर्षांपूर्वी फायनान्स कंपनीकडून घर बांधण्यासाठी ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. गृहकर्ज घेतल्यानंतर लोहार कुटुंबाने तीन वर्षांपासून सतत हप्ते भरले होते. मात्र वृद्ध आईची तब्येत बिघडल्याने व मुलीची प्रसुती झाल्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून हप्ते भरणे अशक्य झाले होते. हप्ते न भरल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी पोलीस व वकिलांच्या उपस्थितीत घर जप्त करण्यात आले. यामुळे लोहार कुटुंब रस्त्यावर आले आहे. घरातील वस्तू नेऊ न देता घराबाहेर हाकलून दिल्याचे ते सांगत आहेत. सध्या हे गरीब कुटुंब घराशेजारी असलेल्या लहानशा शेडमध्ये किंवा नातेवाईकांच्या घरी वेळ घालवत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta