
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्यावतीने आयोजित महिला मेळावा तथा हळदी -कुंकू समारंभ कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे नुकताच उदंड प्रतिसादात उत्साहात पार पडला.
म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने दरसाल महिला मेळावा म्हणजे हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात येतो. दरवर्षी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले जाते. यंदा देखील गेल्या गेल्या शनिवारी 1 जानेवारी रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे हा हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांना कायद्याचे ज्ञान देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या ठिकाणी वकिली करणाऱ्या ॲड. तृप्ती प्रसाद सडेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महिला आघाडीच्या अध्यक्षा उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाप्रसंगी व्यासपीठावर माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, मधुश्री पुजारी, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, रूपा नेसरकर, माया कडोलकर व आघाडीच्या सेक्रेटरी माजी महापौर सरिता पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी अर्चना देसाई व समूहाने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केल्यानंतर अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश व महिला आघाडीच्या कार्याची माहिती दिली. प्रमुख पाहुण्या ॲड. सडेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्याद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात ॲड. तृप्ती सडेकर मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. स्त्री हजारो संकटे येऊन सुद्धा कणखरपणे उभी असते, ती खचून जात नाही. उच्च कोटीच्या यशाला पोहोचली तरी ती आपले बाईपण विसरत नाही. आपली संस्कृती, चालीरीती, परंपरा जतन करते असेही त्यांनी सांगितले. हळदी -कुंकू समारंभाचे औचित्य साधून महिला आघाडीतर्फे नृत्य, मंगळागौर वगैरे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये स्फूर्ती सांस्कृतिक ग्रुप, सांस्कृतिक ग्रुप, श्री गणेश ग्रुप, उमा भाटी ग्रुप, मंगाई भजनी ग्रुप, सुकन्या ग्रुप आदींनी क्रमांक पटकावले. यावेळी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेलाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावर्षी महिला आघाडीच्या ‘होम मिनिस्टर’ म्हणून शितल नाईक या विजेत्या ठरल्या. नृत्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अशोक बंडी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले. शेवटी सरिता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. महिला आघाडीच्या महिला मेळावा तथा हळदीकुंकू समारंभास भाग्यश्री जाधव, अर्चना कांबळे आदींसह सुमारे 700 ते 800 महिला उपस्थित होत्या.

Belgaum Varta Belgaum Varta