
बेळगाव : बेळगाव परिसरातील हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला आज मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मंदिराच्या वार्षिकोत्सवा निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद सोहळा आयोजित करण्यात आला होता.
हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर हिंदवाडी महिला मंडळाच्या महिला भगिनींनी उभारलेले आहे.
महालक्ष्मी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष प्रारंभ आणि वर्धापन दिन औचित्य साधून मंगळवारी सकाळी मारुती जी. भट आणि अक्षय आर. भट यांच्या पौराहित्या खाली अभिषेक,अलंकार आणि गणपतीपूजा, पुण्यह वाचन, नवग्रह पूजा, लक्ष्मीनारायण हृदय पारायण, श्रीसुक्त होम, महालक्ष्मी मूलमंत्र होम, पूर्णाहूती, महामंगलारती आदी धार्मिक कार्यक्रम विधी भक्तिमय वातावरणात पार पडले. मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
वार्षिकोत्सवानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. हिंदवाडी, शहापूर, वडगाव, खासबाग, भाग्यनगर परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी या सोहळ्यात भाग घेऊन देवी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.
हिंदवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली, हिंदवाडी महालक्ष्मी मंदिर सुवर्ण महोत्सवाची वाटचाल करीत आहे. मंडळाच्या उपाध्यक्ष अश्विनी जांगळे, स्वाती कंग्राळकर, सेक्रेटरी भारती किल्लेकर, उपसेक्रेटरी सुरेखा सावंत, खजिनदार पद्मजा कामत, उपखजिनदार सुमेधा जोशी, कार्यकारी सदस्या सुमती कुदळे, पार्वती भातकांडे, स्मृती कामत, कमल यादव, मंगल शिरोडकर, स्मिता कामत, सुवर्णा शिंपी, सुनीता शिरोडकर, पल्लवी कंग्राळकर, शितल नेसरीकर, आशा पट्टण, हेमांगी ओऊळकर आदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta