बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून गौरी चौगुले या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.सर सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिल्पा गर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये ‘विज्ञान गीत ‘विद्यार्थ्यांनी सादर केले. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी संगीत साथ दिली. विद्यार्थिनी श्रेया घोळसे हिने रामन इफेक्टबद्दल माहिती दिली.
सर सी. व्ही. रामन हे भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रकाशाच्या वक्रीभवनाच्या संबंधी संशोधन केले. या संशोधनाला रामन प्रभाव या नावाने ओळखले जाते.यांना १९३० साली जगातील सर्वोत्तम असे नोबेल पारितोषिक मिळाले. निसर्गावर व विशेषतः फुलांवर त्यांचे खूप प्रेम होते व त्यांचा समग्र दृष्टीकोनच वैज्ञानिक होता. अशा शब्दात प्रमुख पाहुण्या गौरी चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके बनवली होती. विज्ञान प्रतिकृती स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. सांस्कृतिक विभाग प्रमुख शैला पाटील व स्नेहल पोटे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थिनी अनुष्का पाटील हिने केले.
Belgaum Varta Belgaum Varta