बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सीमावाद प्रकरणी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असून, या संदर्भात सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारकडून दावा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या खटल्याच्या सुनावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञ व उच्चाधिकार समितींच्या बैठका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आमदार जयंत पाटील यांना निवेदन दिले होते, ज्यामध्ये १० प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अत्याचाराची दखल घ्यावी आणि नव्याने तज्ज्ञ समिती व उच्चाधिकार समिती गठीत करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालावर विधानसभेत चर्चा घडवून आणावी, अशीही त्यांनी सूचना केली आहे. या मागण्यांची तातडीने दखल घेऊन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta