
शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलन बहारदार रंगले :मराठी भाषा गौरव दिवस आणि महिला दिनानिमित्त आयोजन
बेळगाव : मराठी कवितेतल्या कवींची जी नावे घेतो त्यांनी खूप चांगलं काहीतरी लिहून ठेवलं आहे. जर आपण आपल्या कवितेवर निष्ठा ठेवली तर पुढल्या पिढीला आजची नावे मिळतील. ही निष्ठा म्हणजे आपण निरंतर चांगलं वाचत गेलं पाहिजे. त्यातून नवनवीन आशय सापडतील आणि कवींची दृष्टी प्रगल्भ होईल. असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार वैशाली माळी यांनी केले.
येथील शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे सरस्वती वाचनालयात मराठी भाषा गौरव दिवस आणि महिला दिनाचे औचित्य साधून निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. कवी संमेलनाध्यक्षा म्हणून वैशाली माळी बोलत होत्या. प्रारंभी नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्या हस्ते कुसुमाग्रज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून उदघाटन करण्यात आले. सभामंचावर प्रा. अशोक आलगोंडी, सुधाकर गावडे, कवयित्री दीपाली चरेगावकर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक उर्मिला शहा यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय शीतल पाटील यांनी करून दिला.
वैशाली माळी यांनी उपस्थित कवींना मार्गर्शन केले आणि आपल्या कविता व गझला सादर केल्या.
“माहीत नाही तो कोणाला फॉलो करतो हल्ली
जगणे सोडून जगण्यावरती बोलत बसतो हल्ली
आभासी दुनियेचा त्याला कंटाळा आला का
मुलगा माझा माणसात वरचेवर रमतो हल्ली” (गझल)
“पाप म्हणू की शाप म्हणावे, या देहाला म्हणू काय मी
किती वाजवू टाळ्या अन किती म्हणू हाय हाय मी ”
ही तृतीयपंथी (हिजडे) यांची व्यथा मांडणारी कविता सादर केली. अत्यंत मधुर आणि ओघवत्या भाषेत दीपाली चरेगावकर यांनी कवयित्री संमेलनाचे निवेदन करून कवी संमेलनात बहारदारपणा आणला.
“शुभ्र उंचावून गुडी चाफा हर्षला पानात
आला वसंत वसंत साऱ्या मनात मनात
कुठे शाल्मली सावरी लाल शेंदरी पदर
कुणी पलाश पलाट त्याचे केशरी अढर”
अशी निसर्गाचं शब्द लेणं उधळणारी कविता त्यांनी सादर केली. यावेळी निमंत्रित कवयित्रींनी एकापेक्षा एक सुंदर आणि अर्थपूर्ण कविता सादर केल्या. यामध्ये नंदिनी दामले (सदाफुली, आयुष्य) मंदाकिनी देसाई (चूक तुझी आहे, कुणीतरी केंव्हातरी), विद्या देशपांडे (कथा माझी कथा तुझी, माय लेक), लता माने, पुनः नव्याने जन्मेन मी, आता थोडं स्वतःसाठी जगायचं), सीमा कणबरकर (लेक, ती), सुलोचना पाटील (विझवू नकोस दिवा जिद्द ), अस्मिता देशपांडे (कशी ओ सुचते, कुणी मागून नसतं घेतलेलं), स्मिता किल्लेकर (झेप , त्या तिघी), रेवा देऊळगावकर (औदुंबर), अश्विनी ओगले (एकटेपण), उर्मिला शहा (बायो, आई आणि मी), रेखा गद्रे (शब्दगंध, महिला दिन), स्वरूपा इनामदार (स्त्री जन्म, अज्ञानी शिल्प), शीतल पाटील (कविता मराठी आपुली, साऊ माईच पत्र)
सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी तर आभार अस्मिता देशपांडे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta