मार्कंडेय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ
बेळगाव : स्वप्न नेहमी मोठी पाहा, पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा. प्रत्येक अडचण ही नव्या संधीची सुरुवात असते. मेहनत, सातत्य आणि सकारात्मक विचारसरणी या त्रिसूत्रीने तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल असे उदगार सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी काढले.
मार्कंडेय हायस्कूल, मार्केट यार्ड येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती एन. जे. चौगुले होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर नववीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. सौ. आर. जी. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी तेजस्विनी बेळगावकर, अमृता साळुंखे, प्राची निलजकर, हर्षदा पाटील, जयश्री पाटील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळेबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
श्रीमती डी. के. पाऊसकर यांनी विद्यार्थ्यांना ध्येय, सकारात्मक विचार व मेहनतीचे महत्त्व सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री. बी. बी. धामणेकर यांनी वार्षिक क्रीडा स्पर्धांचा अहवाल सादर केला. वार्षिक क्रीडा व बौद्धिक स्पर्धांचे बक्षीस वितरण रणजीत चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात श्रीमती एन. जे. चौगुले यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. एम. अष्टेकर यांनी केले, तर आभार श्रीमती डी. ए. पाटील यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.