बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाग साहित्य परिवाराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जायंट्स मेन ग्रूप येथे बाग परिवार कवींचे कविसंमेलन नुकतेच पार पडले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांना निमंत्रित करण्यात आले होते. कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी मा.बसवंत शहापूरकर व मार्गदर्शक म्हणून पुढारीचे पत्रकार मा. शिवाजी शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहूणे प्रसाद पंडित यांचे मराठी संस्कृती या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्नेहल बर्डे यांच्या स्वागत गीताने झाली. मान्यवरांनी सुरूवातीस कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रोपट्याला पाणी घातले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता किल्लेकर यांनी केले. सन्मानीय पाहुण्यांचा परिचय अस्मिता आळतेकर, अपर्णा पाटील, गुरुनाथ किरमटे यांनी केला. मान्यवरांचा रोपटे एवं पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. प्रसाद पंडित यांचा सन्मान निळूभाऊ नार्वेकर यांच्या हस्ते, कवी मा. बसवंत शहापूरकर यांचा सन्मान अशोक सुतार यांच्या हस्ते, व पत्रकार मा.शिवाजी शिंदे यांचा सन्मान शुभदा प्रभूखानोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मराठी संस्कृतीबद्दल बोलताना प्रसाद पंडित यांनी मराठी बारा महिन्यांचे मराठी सण यामागील शास्त्रीय एवं वैज्ञानिक कारण काय आहे आणि त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग होतो हे पटवून दिले. आपली मराठी भाषा हि खुप समृद्ध आहे.आजच्या पीढीला आपले सणवार आणि त्यामागील आपली संस्कृती काय आहे हे जाणून देण्यासाठी पालकांनी आधी आपली भूमिका मांडली पाहिजे आणि आपल्या संस्कृती बद्दल मुलांना त्यांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे तरचं आपली मराठी संस्कृती टिकेल, असे अनमोल मार्गदर्शन करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.
व्याख्यानानंतर प्रसाद पंडित यांच्या दर्जेदार कवितेने कविसंमेलनाची सुरुवात झाली. त्यानंतर अक्षता यळ्ळूरकर- छावा, किरण पाटील- दाताची सखी जीभ, अशोक सुतार- बाग साहित्य परिवार, स्नेहल बर्डे- मी मराठी भाषा मराठी, चंद्रशेखर गायकवाड- एक देशी खंबा, प्रतिभा सडेकर- अलंकाराने नटलेली माझी मराठी माय, स्मिता पाटील- धनी माझा, प्रेमा मेणशी- शिव, अपर्णा पाटील- सखी, शुभदा प्रभूखानोलकर – असे आमचे हो कोकण, शितल पाटील- मराठी आपूली, हर्षद शिंदे- कविता आहे की आणखी काही? , जोतिबा नागवडेकर- अस्सं का? , दत्ता घोडके- रांग, गुरुनाथ किरमिटे- मोह, अशा कवींच्या विविध विषयांवरील दर्जेदार कवितांचे सादरीकरण ऊत्साहात झाले. मार्गदर्शक म्हणून शिवाजी शिंदे यांनी मार्गदर्शकपर भाषण केले. बसवंत शहापूरकर यांनी कवींच्या कवितांवर प्रतिक्रिया देऊन अध्यक्ष पद सांभाळले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कवींनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जेष्ठ कवी निळूभाऊ नार्वेकर, सिंधुताई जोशी, अविनाश पाटील, अवधूत प्रभूखानोलकर, चंद्रशेखर गायकवाड,मधु पाटील आदी काव्यरसिक उपस्थित होते.
कविसंमेलन समारोपाआधी दिल्ली संमेलनात सहभागी झालेल्या कवयित्री अस्मिता आळतेकर, अपर्णा पाटील, स्मिता किल्लेकर, मनिषा नाडगौडा, प्रतिभा सडेकर, रोशनी हुंदरे आणि शितल पाटील यांचा महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पाहूणे प्रसाद पंडित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्मिता पाटील यांनी पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप केला. सुत्रसंचालन रोशनी हुंदरे व आभार प्रदर्शन मनिषा नाडगौडा यांनी केले.