बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात पिसाळलेल्या कुत्र्याने मंदिरात घुसून केलेल्या अचानक हल्ल्यात आठ ग्रामस्थ जखमी झाले आहेत. जखमींवर बीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक मंदिरात घुसून ग्रामस्थांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेसह सहा पुरुष गंभीर जखमी झाले. ही घटना विठ्ठल मंदिरात सायंकाळी घडली. कुत्र्याने मंदिरात घुसून मल्लप्पा पाटील, मल्लप्रभा पाटील, नीलकंठ साकरें, विठ्ठल मांडेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांवर अचानक हल्ला केला. एका व्यक्तीच्या हाताच्या बोटांपासून ते कोपऱ्यापर्यंत कुत्र्याने चावा घेतला असून या हल्ल्यात आणखी सात जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तत्काळ बीम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी त्या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले आहे. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.