बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावाजवळील सर्व्हे क्र. 123 व 124 मधील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार त्वरित थांबवावा. तसेच या संदर्भात कोरे आणि मुनवळ्ळी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी कल्लेहोळ येथील संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कल्लेहोळ येथील बहुसंख्य अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमून शेतकरी उत्तम कृष्णा रक्षे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी कोरे आणि मुनवळ्ळी यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन उपस्थित शेतकऱ्यांनी हिरवे शेले फडकावत जोरदार निदर्शने केली. तसेच कोरे व मुनवळ्ळी यांची दादागिरी थांबून शेतकऱ्यांना न्याय द्या अशी जोरदार मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.
या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना एका अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे वकील ॲड. विठ्ठल उपरी यांनी सांगितले की, बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावामधील सर्व्हे नं. 123 124 व अन्य कांही सर्व्हे नंबर मधील सुमारे 50-100 लोकांच्या जमिनी बेकायदेशीररित्या बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझे अशिल हे सेवानिवृत्त जवान आहेत. प्राण पणाला लावून देशसेवा केलेल्या या व्यक्तीची जमीन देखील हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पद्धतीने ज्या 50 ते 100 शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित जमीन सदर शेतकरी वडिलोपार्जित कसत आहेत. मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या जमिनीच्या उताऱ्यांवर अमित प्रभाकर कोरे व संतोष शंकर मुनवळ्ळी यांची नावे चढवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधितांना जाब विचारून देखील समाधानकारक स्पष्टीकरण न देता उडवाउडवी केली जात असल्यामुळे आज आम्ही त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यास आलो आहोत.
कल्लेहोळ येथील एका संतप्त शेतकरी महिलेने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आम्हा येथे उपस्थित असलेल्या सर्वांची बेळगुंदी रस्त्याशेजारी 150 एकर जमीन आहे मात्र अमित कोरे व संतोष मुनवळ्ळी यांनी आमच्या वाडवडिलांना फसवून ही जमीन बळकावली आहे असे सांगितले. सुरक्षारक्षक ठेवून आम्हाला आमच्या जमिनीत जाण्यास मज्जाव केला जात आहे.
संबंधित सुरक्षा रक्षक चाकूसुऱ्याचा धाक दाखवत असल्यामुळे आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनीत पाय ठेवण्यास भीती वाटत आहे. आम्ही जमिनीत पाय ठेवू नये यासाठी जेसीबीने जमिनी सभोवती चर खोदण्यात आली आहे. सदर जमीन हेच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. शेत पिकाबरोबरच आमच्या जमिनीतील काजूची झाडे उध्वस्त करण्यात आली आहेत.
त्यामुळे जर या पद्धतीने आम्हा शेतकऱ्यांची जमीन बळकवल्यास आम्ही कसे जगायचे? गेल्या पाच-सहा वर्षापासून आम्ही या परिस्थितीला तोंड देत आहोत अशी माहिती देऊन आता आमच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे.
त्यामुळे उद्यापासून आम्ही कोणालाही न जुमानता आमच्या शेतात जाऊन शेतीच्या कामाला प्रारंभ करणार आहोत आणि जर कोणी आडकाठी करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही महिलावर्ग त्यांना चांगला धडा शिकवू, असा इशारा संबंधित शेतकरी महिलेने दिला.