Tuesday , December 9 2025
Breaking News

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

शिवाजी विद्यापीठ समितीचा निपाणी, बेळगाव, खानापूर परिसरात दौरा

कोल्हापूर : बेळगावसह सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत तसेच सवलतीच्या दरात शिक्षण घेता यावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांत राखीव जागांसह अनेक सवलती देण्यास गेल्या तीन वर्षांपासून सुरवात केली आहे. यंदाही या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक शिष्टमंडळाने सीमाभागातील विविध ठिकाणांना भेटी देऊन विद्यार्थी, पालकांशी सुसंवाद साधला. त्यांना ३० एप्रिलपर्यंत शिवाजी विद्यापीठात प्रवेश अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. या मोहिमेला पालक-विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावांतील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाने प्रत्येक अभ्यासक्रमात १० टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. विज्ञान, वाणिज्य, कला व ललित कला यांसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकणार आहेत. यामध्ये अनुदानित अभ्यासक्रमांसाठी ट्यूशन फी पूर्ण माफ असून विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५ टक्के सवलत देण्यात येते. त्याखेरीज वसतिगृहात राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शुल्कात सवलत आहे. इतरही अनेक सुविधा सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ कॅम्पसवर उपलब्ध आहेत. या योजनेची प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी विद्यापीठाने विशेष समिती गठित केली आहे. या समितीचे सदस्य डॉ. जगन कराडे, डॉ. नवनाथ वळेकर, डॉ. श्रीपाल गायकवाड, डॉ. कविता वड्राळे आणि डॉ. संतोष सुतार यांनी गेल्या आठवडाभरात निपाणी, खानापूर, बेळगाव, उदगीर आणि भालकी या ठिकाणांना भेटी दिल्या. स्थानिक महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून इच्छुक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधण्यात आला. सध्या या योजनेतून १०० हून अधिक विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत असल्याची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.

निपाणी येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जयराम मिरजकर, बाबासाहेब मगदूम, उदय शिंदे, राजू मिस्त्री उपस्थित होते. खानापूर येथील बैठकीला गोपाळ मुरारी पाटील, आबासाहेब दळवी, संजीव पाटील, हेब्बाळकर गुरूजी, अमृत शेलार, राजाराम देसाई, पुंडलिक पाटील, अजित पाटील, केशव कळेकर उपस्थित होते. तर, बेळगाव येथील कार्यक्रमास प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, शिवराज पाटील, दत्ता उघाडे, महेश जुवेकर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *