बेळगाव : बेळगाव शहरातील टिळकवाडीत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बहुमजली कलामंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन 20 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, तसेच नगरविकास मंत्री भैरती सुरेश उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दक्षिणचे आमदार अभय पाटील हे भूषवणार आहेत. विशेष आमंत्रितांमध्ये प्रमुख सचिव अशोक पाटील, दिल्लीतील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि विविध शासकीय संस्था व महापालिकेचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या समारंभाला राज्यसभेचे खासदार ईरण्णा कडाडी, लोकसभेच्या चिकोडी मतदारसंघाच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, तसेच बेळगाव, उत्तर कर्नाटक व इतर भागातील अनेक खासदार व आमदार मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या नव्या कलामंदिरामुळे बेळगाव शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठा चालना मिळणार असून, स्थानिक कलाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिकांना या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र कला मंदिरच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत चक्क महापौरांच्या नावाचा विसर पडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta