
संजीवीनी फौंडेशनची नई दिशा एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
बेळगाव : मानसिक आजाराला कायमस्वरूपी औषोधपचाराची गरज असून त्यासोबत मनोरुग्णांना समाजाचे पाठबळ आवश्यक असल्याचे मत धारवाड येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद पांडुरंगी यांनी व्यक्त केले.
जसे मधुमेह रक्तदाब थायरॉईड असलेल्या रुग्णांना कायमस्वरूपी औषोधपचाराची गरज असते तसेच मनोरुग्णांना सुद्धा असते, त्यांना खरी गरज असते ती समाजाच्या सहकार्याची. त्यांच्या आकलन शक्तीनुसार त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्यास तेही समाजात वावरतील असेही त्यांनी सांगितले.
संजीवीनी फौंडेशनने नई दिशा ही मनोरुग्णांसाठी एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती त्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर चेअरमन मदन बामणे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक आप्पासाहेब गुरव, बीम्सचे मानसोपचार विभाग प्रमुख डॉ टी आर चंद्रशेखर, धारवाड मानसिक रुग्णालयाचे मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता अशोक कोरी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रीती, सागरिका, सोनल आणि आदिती या समूहाने स्वागतगीत म्हणून केले.
प्रास्ताविक करताना मदन बामणे यांनी संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून आदर्शनगर बेळगाव येथे मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र तसेच वयस्कारांसाठी काळजीकेंद्र चालवते. गेल्या दोन वर्षापासून मनोरुग्णांना त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी किंवा त्यांच्या समस्यांवर प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करत असतो व यात बेळगाव व परिसरातील तसेच इतर जिल्ह्यातील मनोरुग्णांना मार्गदर्शन, शिक्षण आणि मनोरंजन पुरवले जात असल्याचे सांगितले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सागरिका बालचंद्रन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
चेअरमन मदन बामणे यांच्याहस्ते मान्यवरांना शाल, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर आप्पासाहेब गुरव, डॉ. चंद्रशेखर आणि अशोक कोरी यांनी मानसिक आजार आणि मनोरुग्णांना कसे हाताळले पाहिजे याविषयी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कौशल्य विकास साधण्यासाठी मनोरुग्णांना कागदी फुले, पिशव्या पाकिटे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या खेळातून तसेच नृत्यकलेतून त्यांचे मनोरंजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मनोरुग्णानी डॉक्टरांशी संवाद साधला व आपल्या समस्यांविषयी जाणून घेतले. एकूणच कार्यशाळेत सहभागी झालेल्या मनोरुग्णांना सकारात्मक अनुभव प्राप्त झाला. त्यांनी आपल्या समस्या आणि गरजा मांडल्या आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला. तसेच या कार्यशाळेमुळे मनोरुग्णांच्या कुटुंबियांनाही मनोरुग्णांच्या समस्या आणि गरजांबद्दल अधिक माहिती मिळाली, ज्यामुळे ते त्यांना अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकले.
ही एक दिवशीय नई दिशा कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पीआरओ पद्मा औषेकर, समुपदेशक पुष्पा भेंडवाड सुनिल चन्नदासर, सावित्री माळी, मल्लिकार्जुन मादार, वैष्णवी धामणेकर तसेच नई उमंगच्या प्रमुख वैष्णवी नेवगिरी, स्वयम तिरकन्नावर, यांचे विशेष योगदान लाभले. या कार्यशाळेत सुमारे पन्नासहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी कलदुर्गी यांनी केले तर आभार आकाश रामण्णावर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta