Tuesday , December 9 2025
Breaking News

बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्काराचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव, मराठी विद्यानिकेतन बेळगाव व ओऊळकर कुटुंबीय यांच्या वतीने प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन गटात चित्रकला स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले जाते. बहिर्जी ओऊळकर यांच्या स्मरणार्थ ओऊळकर कुटुंबीयांच्या वतीने गेली बारा वर्षे या चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यावर्षी या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये बेळगाव परिसरातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालये यामधील असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे खजिनदार श्री नारायण खांडेकर, प्रमुख पाहुणे जे एन भंडारी स्कूलचे प्राचार्य सुभाष देसाई, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजाभाऊ पाटील सर, बीके कॉलेजचे प्राचार्य एस एन पाटील सर, श्री सुभाष ओऊळकर व प्राचार्य आनंद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन पाटील यांनी केले तर पाहुण्यांची ओळख गौरी चौगुले ओऊळकर यांनी करून दिली. प्राचार्य सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात मुलांना चित्रकलेविषयी कशी आवड निर्माण करावी चित्रकला कशी शिकता येते त्याची आवड कशी जोपासता येते याचे उदाहरण देऊन सविस्तर विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात श्री नारायण खांडेकर यांनी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांचा आढावा घेतला या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्यांचा विकास करावा असे आवाहन केले.
यानंतर श्री सुभाष ओऊळकर यांनी आपले ज्येष्ठ बंधू आनंद ओऊळकर यांच्या नावाने दिली जाणारी आनंद शिक्षण निधी योजना याचे स्वरूप स्पष्ट केले. भाऊराव काकतकर महाविद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली यावर्षी ही पाच हजार रुपयांची मदत एकूण 13 विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली. तसेच बहिर्जी ओवळकर यांच्या नावाने सुरू केलेल्या चित्रकला स्पर्धेचा हेतू स्पष्ट केला. यानंतर बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ दि इयर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये पाचवी ते सातवी या गटात प्रथम क्रमांक श्रावणी पेडणेकर मराठी विद्यानिकेतन, द्वितीय क्रमांक तृप्ती भगत मराठी विद्यानिकेतन तर तृतीय क्रमांक आराध्या रेडेकर ज्योती सेंट्रल स्कूल.

आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांक श्रेया बातकांडे मराठी विद्यानिकेतन, द्वितीय क्रमांक अवधूत सुतार वनश्री हायस्कूल हलगा तर तृतीय क्रमांक परसराम पाटील मलप्रभा हायस्कूल चापगाव.

महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक अनन्या शिंदे बीबीए कॉलेज बेळगाव, द्वितीय क्रमांक निखिल आजगावकर ज्योती पियू कॉलेज तर तृतीय क्रमांक श्रेया चलवटी भाऊराव काकतकर कॉलेज बेळगाव यांनी यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *