
बेळगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावात ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राइट्स – बेळगाव विभाग आणि बेळगाव पॅस्टर्स अँड ख्रिश्चन लीडर्स असोसिएशन यांच्या वतीने या शांततेच्या आणि ऐक्याच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ही मूक मिरवणूक सेंट्रल मेथोडिस्ट चर्च येथून सुरू होऊन राणी चन्नम्मा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून देशात शांतता प्रस्थापित करण्याची आणि दहशतवादास थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. ही घटना केवळ आपल्या देशासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत लज्जास्पद व निषेधार्ह आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या अमानवी कृत्याचा संपूर्ण ख्रिश्चन समाजाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या मूक मिरवणुकीत पास्तर टी. थॉमस, अॅड. एम. रमेश, फादर प्रमोद कुमार, लुईस रोड्रिग्ज, क्लारा फर्नांडिस यांच्यासह ख्रिश्चन समाजातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta