
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली निरपराध हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप करत आज बेळगाव येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथे धर्मग्रंथ जाळण्याच्या घटनेची योग्य चौकशी करण्याऐवजी निष्पाप हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ करण्याच्या पोलिसांच्या धोरणाचा निषेध करून या प्रकरणी पारदर्शक चौकशीची मागणी करत, संतीबस्तवाड येथील ग्रामस्थांनी आज विविध हिंदू संघटनांच्या सहकार्याने बेळगाव येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये तीव्र आंदोलन केले.

यावेळी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, बेळगावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहेत. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ जाळणे निषेधार्ह आहे. पोलिसांनी योग्य तपास करावा. त्याशिवाय कुणाच्या दबावाला बळी पडून केवळ हिंदू तरुणांना अटक करून त्रास देणे योग्य नाही. हिंदू बांगड्या घालत नाहीत. पोलीस खात्याने आपला सन्मान गमावू नये. हिंदूंना शस्त्रे उचलून लढण्यासाठी चिथावणी देऊ नये, असे ते म्हणाले.
तर संतीबस्तवाड गावातील वकील प्रसाद म्हणाले, मशिदीच्या चाव्या आणि धर्मग्रंथ कुठे आहेत? हे हिंदूंना कसे कळेल? ग्रामपंचायत किंवा पोलीस विभागाच्या लक्षात न आणता सीसीटीव्ही कसे उघडले? मौलाना गावी गेले असताना ही घटना कशी घडली? केवळ एका बाजूने तपास करणे योग्य नाही. निरपराध हिंदू तरुणांना अटक करून ४ ते ५ दिवस पोलिस स्थानकात ठेवणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

भाजप नेते धनंजय जाधव म्हणाले की, पोलिसांच्या भितीमुळे निष्पाप हिंदू तरुण आपले घर सोडून जात आहेत. हिंदू अशी चुकीची कामे करत नाहीत, हे एक षडयंत्र आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा संशय आहे. जर हिंदूंना त्रास झाला तर त्यांना जिल्ह्यातून शांतता मोर्चा काढावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी संतीबस्तवाड ग्रामस्थांसह विश्व हिंदू परिषद आणि विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta