Saturday , December 13 2025
Breaking News

डॉक्टरांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवा : डॉ. दत्तप्रसाद गिजरे

Spread the love

 

आदर्श माता सन्मान सोहळा उत्साहात

बेळगाव : “डॉक्टर आपल्या अनुभवाच्या आधारे सल्ला देतात,डॉक्टरांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवा महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहून वेळच्यावेळी तपासणी करावी. तब्येत गंभीर झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जाणे टाळावे आणि नंतर त्यांना दोष देणे चुकीचे आहे,” असा मोलाचा सल्ला डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांनी दिला.

तारांगण रोटरी क्लब व जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदर्श माता सन्मान सोहळ्या’ प्रसंगी हे विचार व्यक्त करण्यात आले. सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अल्प वयात मुलींची मासिक पाळी सुरू होत आहे त्यामुळे वंध्यत्वासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सुरक्षित मातृत्व बाबत बोलताना ते म्हणाले, ग्रामीण भागात
सुरक्षित मातृत्वाच्या जागृतीसाठी आशा वर्करच मुख्य सूत्रधार आहेत. गर्भवती महिला ते प्रसूती नंतरची माता या कालावधीत आशा वर्कर वेळोवेळी घरी जावून त्यांना मार्गदर्शन करतात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटचे अध्यक्ष सचिन हंगिरकर होते. उद्योजिका पूजा बडदाळे, पूनम हंगिरकर, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे सचिव शिवाजी जळगेकर, सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार, तारांगणच्या संचालिका अरुणा गोजे पाटील, नंदगडचे सरपंच यल्लप्पा गुरव, सविता हेब्बार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी तारांगण केंद्राच्या संचालकांनी रोप भेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

प्रमुख अतिथी पूजा बडदाळे म्हणाल्या, “दैनंदिन धकाधकीत आपण आपल्या आईला विसरत चाललो आहोत. मातृदिन एकाच दिवसापुरता न ठेवता, आईचा सन्मान दररोज व्हावा, तिच्या त्यागाचे स्मरण दररोज व्हावे,” असे सांगून त्यांनी मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.

माझी आई या विशेषांकात आदर्श मातांचा संघर्ष पट प्रसिद्ध केला आहे. अशा अनेक मातांचा संघर्ष पट प्रसिद्ध व्हावा असे उद्गार उद्योजक शिवाजी जळगेकर यांनी काढले.
कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांचे संगोपन करून त्यांना सुसंस्कारित, स्वावलंबी बनवणाऱ्या आदर्श मातांचा गौरव करण्यात आला. वात्सल्य सिंधू रुक्मिणी गुरव, मायेचा सागर दुमनाबाई डिसोझा, संघर्षातून सामर्थ्य निर्माण करणाऱ्या शांता गुरव, संयमी माता द्रौपदी भागवाडकर, स्वाभिमानी व स्वावलंबी माता सुरेखा सांगोळकर, परिवार आणि सामाजिक नाती सांभाळणाऱ्या मंगल खांडेकर, चिरेबंदी घर अस्मिता आळतेकर, उत्साहाचा झरा राजश्री हावळ त्यांच्या कार्याची प्रचिती देणारे प्रेरणादायी क्षण उपस्थितांसाठी भावनिक ठरले.

प्रा. मनीषा नाडगौडा, डॉ.संजीवनी खंडागळे यांनी बहारदार सूत्र संचालन केले. यावेळी अशा पत्रावळी, अश्विनी मांगले, नलिनी गोजे पाटील, केंद्र संचालिका प्रतिभा सडेकर, जयश्री दिवटे, नेत्रा मेणसे, सविता वेसणे, सुधा माणगावकर, अर्चना पाटीलसह अनेक महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळगुंदी येथे शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अतिप्रसंग; गावकऱ्यांनी शिक्षकाला चोपले

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *