
बेळगाव : बेळगुंदी केंद्रात दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री. प्रेमानंद गुरव सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे संयोजक शंकर चौगुले, आय.आर.एस. अधिकारी आकाश चौगुले, प्राध्यापक डी. डी. बेळगावकर, निवृत्त शिक्षक शंकर मासेकर, पुंडलिक सुतार, दशरथ पाऊसकर, रीता बेळगावकर, रेणुका सुतार, गवंडी मॅडम आदी मंडळी उपस्थित होती. प्रारंभी मुलींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाचे सुरुवात होऊन कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे अभिनंदनीय असून विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच न थांबता पुढील शैक्षणिक जीवनात सुद्धा याहीपेक्षा अधिक भरभरून यश संपादन करावं व शाळेबरोबरच आपल्या आई-वडिलांच नाव उज्वल करावं असा संदेश अध्यक्षीय भाषणातून प्रेमानंद गुरव सर यांनी दिला तर आय.आर.एस. अधिकारी आकाश चौगुले यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी स्वखर्चातून 24 तास सर्वांसाठी खुले असणारे वाचनालय व अभ्यासिका जून महिन्यापासून सुरू करणार असल्याचे सांगितले. तसेच डी. डी. बेळगावकर, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, एस. एन. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना अभिनंदनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील यांनी केलं. पाहुण्यांच स्वागत व परिचय सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनी करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता यल्लारी यांनी केले तर आभार रश्मी पाटील यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta