
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या कलारकोप्प येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी स्वतः तयार केलेल्या रस्त्यावर एका व्यक्तीने अडथळा निर्माण केल्याने त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीतील कलारकोप्पचे शेतकरी मोठ्या संख्येने आले होते आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
शेतकरी सिकंदर बागवान यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, जवळपास २० वर्षांपूर्वी १००-१५० एकर शेतीत जाण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येकी ४ गुंठे जमीन देऊन हा रस्ता तयार केला होता. परंतु, आता दुर्गन्नवर नावाच्या एका व्यक्तीने हा रस्ता अचानक बंद केला आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, “आधीच खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, पेरणीची कामे सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत अचानक रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या कामात मोठा अडथळा येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून समस्या सोडवावी.
Belgaum Varta Belgaum Varta