बेळगाव : विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या वतीने शाळेतील एस एस एल सी 2025 वर्षात उत्तम गुण संपादन केलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा शिष्यवृत्तीचे वितरण तसेच विविध मान्यवरांच्या व शिक्षकांच्या कडून प्रोत्साहन पर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शनिवार दिनांक 14 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ.सरजू काटकर आणि राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीचे मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते. व्यासपीठावर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष सुरेश पाटील, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, बी. जी. पाटील, नीला आपटे उपस्थित होते. मराठी विद्यानिकेतन तर्फे यावर्षीपासून शाळेतील दहावी परीक्षा उत्तम गुणांनी पास झालेल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी रोख रक्कम दहा हजार रुपयाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली होती. ही शिष्यवृत्ती यावर्षी निकिता काळे, यशश्री रेडेकर, किशोर गावडे, सपना देसाई, अक्षय पाटील, नेहा पाटील, प्रियंका पाटील, श्रीयन पाटील, श्रेया शिंदे, आदिती गावडे, प्रसाद मोळेराखी, पल्लवी खुडे या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर मनाली दळवी हिला शामकांत दोरूगडे यांच्याकडून दहावी परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल अकरा हजार रुपये रोख रक्कमेचे पारितोषिक व प्रसाद मोळेराखी याला श्री. सुरेश गडकरी यांच्याकडून 7000 रू रकमेचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहन पुरस्कारांचेही मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी ज्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरती विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे, त्यांचाही सन्मान करण्यात आला. वेटलिफ्टिंग कोच पूजा संताजी. अटल प्रमुख श्वेता सुर्वे, ग्रंथालय प्रमुख हर्षदा सुंठणकर व स्नेहल पोटे या शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. डॉ. होमी भाभा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या सृजन पाटील व इम्फाळ येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केलेल्या आदिती पाटील या दोघांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते व मान्यवर डॉ.सरजू काटकर व डॉ.चंद्रकांत वाघमारे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती बद्दल आनंद व्यक्त करत आंबेडकरांचे विचार आपल्यामध्ये रुजवावे असे आवाहन केले.
डॉ.चंद्रकांत वाघमारे यांनी पुढील वर्षी दहावी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 11000 रुपयाचे पारितोषिक ही जाहीर केले. सुभाष ओऊळकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक व स्वागत नीला आपटे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला सुरेश गडकरी, मोहन कुंभार, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवराज चव्हाण व प्रसाद सावंत यांनी केले. आभार नारायण उडकेकर यांनी व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta