
बेळगाव : आपल्या जीवनात मोठे होण्यासाठी मोठे उद्दिष्ट ठेवले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने कष्ट व मेहनत घेतली पाहिजे तरच माणूस आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष व उद्योजक महादेव चौगुले यांनी तारांगण मार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, अपयश यशाची पहिली पायरी आहे. अपयश मिळाल्यावर खचून न जाता अधिक प्रयत्न करून यश आपण मिळवू शकतो. मी स्वतः देखील दहावी नापास झाल्यानंतर न खचता मला मोठं व्हायचंय या उद्देशाने मेहनत केली आणि आता कारखानदार म्हणून यशस्वी बनलो आहे.
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त या व्यासपीठामार्फत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ आयोजित केला होता.
व्यासपीठावर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, निबंध स्पर्धेचे परीक्षक सी. वाय. पाटील, ॲपटेक एव्हिएशन सेंटरचे विनोद बामणे, ज्योती बामणे तारांगणच्या संचालिका अरुणा गोजे-पाटील होते.
प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अरुणा गोजे- पाटील यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले. व्यासपीठावरील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ऍड. सुधीर चव्हाण म्हणाले, पुस्तकी ज्ञान गरजेचे आहे पण त्याबरोबर व्यवहार ज्ञान ही विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे तसेच चांगले संस्कार ही विद्यार्थ्यांच्यावर होणे गरजेचे आहे.
परीक्षक सी. वाय. पाटील म्हणाले, निबंध करताना वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने लिहिले आहेत. लेखन कला चांगली करावयाची असल्यास सखोल अभ्यास करून लिहावे, मोजकेच लिहावे. स्वतःच्या भाषेत अर्थपूर्ण निबंध लिहावा. युद्धामध्ये लढण्यासाठी चांगल्या रक्ताची गरज असते त्याप्रमाणे गाठण्यासाठी अथक परिश्रमांची गरज असते.
ॲपटेक एव्हिएशन सेंटरचे विनोद बामणे म्हणाले की, शिक्षणासाठी वयाची गरज नाही. इच्छा तीव्र असावी लागते. मातृभाषेत शिकलेली व्यक्ती जगाच्या पाठीवर ज्ञानाच्या हिमतीवर कर्तृत्ववान होऊ शकते.
ज्योती बामणे यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे कौतुक करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रकाश पाटील यांनी ॲपटेक एव्हिएशन सेंटरच्या विविध कोर्सेसची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. बेळगाव जिल्हा लघुउद्योजक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महादेव चौगुले व जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुधीर चव्हाणचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तारांगणच्या दिवटे, सविता वेसने, स्मिता मेंडके, स्मिता चिंचणीकर, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक कानशिडे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta