बेळगाव : मंदिराच्या जागेच्या वादातून खून झालेल्या बेळगाव तालुक्यातील गौंडवाड येथील सतीश पाटील यांच्या कुटुंबीयांना सुमारे तीन वर्षांनी न्याय मिळाला आहे. या प्रकरणात ९ पैकी ५ आरोपींना जन्मठेप, तर ४ जणांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली असून, एकूण १३ लाख ७५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
बेळगाव तालुक्यातील गौंडवाड गावात गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या जागेवरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊन काही लोकांनी सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांची हत्या केली. या घटनेनंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता, काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून २५ जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. अनेक पुरावे आणि साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर, बेळगावच्या दुसऱ्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपींना ही शिक्षा सुनावली.
यावेळी बोलताना मयत सतीश पाटील यांच्या मातोश्री म्हणाल्या, ‘माझ्या मुलाची कपटाने हत्या केली. तो मारला गेला, तेव्हा त्याचा मुलगा फक्त चार दिवसांचा होता. आम्ही आता म्हातारे झालो असून, आजारपण वाढले आहे. आमच्या कुटुंबाचा आधार कोण? पण आज न्यायदेवतेने केवळ माझ्या मुलालाच नव्हे, तर संपूर्ण गावाला न्याय दिला आहे”.
सतीश यांच्या पत्नी म्हणाल्या, “काही लोकांनी बनावट कागदपत्रे तयार करून मंदिराची जमीन बळकावली होती आणि ती विकत होते. हा गैरव्यवहार उघडकीस आणल्यामुळे त्यांनी माझ्या पतीची तीन वर्षांपूर्वी हत्या केली. तीन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर मला न्याय मिळाला आहे. न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे मी न्यायालयाची आणि ग्रामस्थांची ऋणी आहे.
या संदर्भात बोलताना वकील श्यामसुंदर पत्तार यांनी माध्यमांना माहिती दिली की, ‘सतीश पाटील खून प्रकरणात बेळगावच्या दुसऱ्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने एकूण ९ आरोपींपैकी ५ जणांना जन्मठेप, तर ४ जणांना कठोर शिक्षा सुनावून एकूण १३ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ’यावेळी वकील, सतीश पाटील यांचे कुटुंबीय आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta