बेळगाव : मॉर्निंग वॉकिंग करणाऱ्या इसमाला पाठीमागून अनियंत्रित मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला तर या घटनेत रस्त्याशेजारी झाड देखील उखडून पडल्याची घटना घडली आहे. जुना पी. बी. रोड अर्थात बी. एस. येडियुरप्पा मार्ग येथे बळळारी नाल्याजवळ रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात झाला असून यात प्रताप लक्ष्मण सालगुडे वय 49 वर्ष राहणार जुने बेळगाव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार मयत प्रताप हे दररोज नेहमीप्रमाणे जुने बेळगावपासून अलारवाड क्रॉसपर्यंत वॉकिंगला गेले होते. रस्त्याच्या कडेने चालत असतेवेळी पाठीमागून नियंत्रण सुटलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत त्यांच्या डोक्याला जोराची धडक बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मालवाहू गाडीच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं होतं त्यामुळे चालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही, सदर चार चाकी इतकी वेगात होती की, रस्त्या शेजारील झाडाला आदळली त्यात झाड देखील उखडून पडले होते. यानंतर त्या गाडीने चालत जाणाऱ्या प्रताप यांना मागून जोराची धडक दिली त्या घटनेत प्रताप यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी रहदारी दक्षिण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
