

खानापूर : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीतून विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी माघार घेतली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी एका व्हिडिओ संदेशातून दिली.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, “डीसीसी बँकेची ऑक्टोबर महिन्यात होणारी निवडणूक पक्षविरहीत आहे. सदर निवडणूक कोणत्याही पक्षाच्या वतीने लढविण्यात येत नाही. खानापूरमधून विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी तालुक्यातील विविध पीकेपीएस सोसायट्यांच्या संचालकांशी संपर्क साधून चांगला प्रतिसाद मिळवला होता. मात्र, जिल्ह्यातील एकंदर राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. “डीसीसी बँकेच्या निवडणुकीबाबत हट्टीहोळी यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली. येत्या काही दिवसांत याबाबत सविस्तर खुलासा करून माहिती देण्यात येईल,” असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
एकंदरीत पाहता चन्नराज हट्टीहोळी यांच्या माघारीमुळे माजी आमदार अरविंद पाटील यांना दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या भूमिकेकडे देखील तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण विठ्ठल हलगेकर यांनी आपले समर्थक असलेले राजू सिद्धाणी यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे पालकमंत्री यातून काय तोडगा काढणार हे पाहणे औत्सुकाचे आहे.


Belgaum Varta Belgaum Varta