
बेळगाव : बाजार गल्ली वडगांव येथील विठ्ठल मंदिरमध्ये सामाजिक समरसता मंच व श्री विठ्ठल मंदिर विकास समिती संयुक्त विद्यमाने भगिनी निवेदिता जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी जीवन विद्या मिशनच्या प्रवचनकार सौ.सुजाता यल्लुसा जितुरी, अध्यक्ष व प्रमुख वक्त्या सौ. स्वरुपाताई ईनामदार, विधान परिषद सदस्य व अखिल भारतीय सामाजिक समरसता मंच टोळी सदस्य श्री.साबण्णा तलवार, हास्य क्लब प्रमुख श्री.अरुण जाधव, संगीत गुरु आदरणीय श्री.शंकर पाटील गुरुजी, विठ्ठल मंदिर विकास समिती अध्यक्ष श्री.मोहन लाड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भगिनी निवेदिता यांच्या प्रतिमेला पुष्पार्चन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री.साबण्णा तलवार यांनी प्रास्ताविक केले. पाहूण्यांचा परिचय व स्वागत विठ्ठल मंदिर विकास समिती सेक्रेटरी श्री. परशुराम पाटील यांनी केले. श्री.भुजंग चौगुले यांनी समरसता गीत सादर केले. पाहुण्यांचा पुष्प व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ.स्वरुपा ईनामदार यांनी आपल्या भाषणात भगिनी निवेदिता यांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेतला. एक विदेशी महिला आपल्या भारतात येऊन भारत भूमीला आपली कर्मभूमी मानून आपले जीवन जन कल्याणासाठी समर्पित करते यावर त्या बोलत होत्या. केवळ अठराव्या वर्षी लंडनची रहिवासी असलेली एक शिक्षिका भारतातील स्वामी विवेकानंदांच्या भाषणाने प्रेरित होते काय आणि त्यांची शिष्या बनून फक्त विसाव्या वर्षी आपला देश, आपली ओळख तिथेच सोडून भारतात येते काय या योगायोगावर त्या विस्तृतपणे बोलत होत्या.भगिनी निवेदिता या नव्या ओळखीने त्या महिलेने खुपच मोलाचे कार्य केले. भारतात पहिले पाऊल बंगालमध्ये पडताच त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा उघडली. विधवा, परित्यक्त्या महिलांसाठी त्यांनी खुपच उत्तम काम केले. स्वातंत्र्यासाठी जनजागृती केली. कशाचाही मोह मनात न धरता ही महिला फक्त जनकल्याणासाठीच शेवटपर्यंत झटत राहिली. अशा या भगिनी निवेदिता सारख्या महिलेच्या आदर्श विचारांना नजरेसमोर ठेवून आपणही थोडे जनकल्याणासाठी शक्य होईल तितके कार्य करत राहिले तरच या सामाजिक समरसतेला खरा अर्थ प्राप्त होईल असे स्वरुपाताईंनी आपल्या भाषणात सांगितले. सामाजिक समरसतेचा खरा अर्थ त्यांनी उलगडून सांगितला.भगिनी निवेदिता यांच्या कार्याचा गौरव करणारे हे भाषण खुपच प्रभावशाली ठरले. त्यानंतर जीवनविद्या मिशनच्या सौ. सुजाता जितुरी यांनीही भगिनी निवेदिता यांच्यावर चार शब्द मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोपात आभार प्रदर्शन श्री. गजानन घाडगे यांनी केले. सुत्रसंचालन सामाजिक समरसता मंच बेळगाव नगर संयोजक श्री. नंदेश कोरी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta