
चोवीस तास मोफत शववाहिका उपलब्ध : ग्रामीण भागातही मिळतेय सेवा
बेळगाव : महिना भरापूर्वी म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीराम सेना हिंदुस्थान आणि श्री. व सौ. लक्ष्मीबाई कोंडुस्कर प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधाम रथाचे लोकार्पण करण्यात आले. या रथामुळे गरीब आणि सामान्य लोकांची सोय झाली असून या मोफत सेवेचे कौतुक होत आहे. आता ही सेवा शहरालगतच्या ग्रामीण भागातही देण्यात येत आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आणि श्री. व सौ. लक्ष्मीबाई कोंडुस्कर प्रतिष्ठानचे संचालक चंद्रकांत कोंडुस्कर सामाजिक बांधिलकी जपत वैकुंठधाम या शववाहिकेचे लोकार्पण केले. महापालिकेकडे असलेल्या अपुऱ्या शववाहिकांमुळे सामान्य लोकांच्या अडचणीच्या काळात खासगी शववाहिकांकडून जादा पैशांची मागणी होत असते. महापालिकेकडून वेळेत शववाहिका सेवा देण्यात येत नाही. त्यामुळे लोकांची ही समस्या ओळखून कोंडुस्कर बंधूंनी वैकुंठधाम रथ शववाहिका लोकांसाठी २४ तास उपलब्ध करून दिली आहे.
गेल्या महिनाभरात या शववाहिकेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. शववाहिका २४ तास उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातही सेवा देण्यात येत आहे. अनेकदा रुग्णालयातून शव गावाकडे नेण्यासाठी रुग्णवाहिकांची मदत घ्यावी लागते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करण्यात येते. त्यामुळे आम्ही ग्रामीण भागातही सेवा देत आहोत. ही सेवा मोफत असल्यामुळे अडचणीच्या काळात लोकांनी 9480731000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रकांत कोंडुस्कर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta