
बेळगाव : 8 डिसेंबर पासून सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना कर्नाटक राज्य रायता संघ आणि हसरू सेना यांनी 11 डिसेंबर रोजी बेळगावात भव्य शेतकरी आंदोलनाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असून यासंदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन देऊन जाहीर करण्यात आले.
संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये कायदेशीर हमीभावासह एमएसपी लागू करणे, उस कारखान्यांकडील थकीत रकमेची तातडीने वसुली, जमिनीच्या अधिग्रहणात योग्य भरपाई, खत–बियाण्यांच्या दरवाढीवर नियंत्रण, शेती कर्जमाफी, सिंचनासाठी निधीवाढ, दुधाला जास्त अनुदान अशा मागण्यांचा समावेश आहे. तसेच महिला व ग्रामीण कामगारांसाठी विशेष योजना राबवणे आणि शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनेने सरकारवर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप करत हिवाळी अधिवेशनात प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. 11 डिसेंबरला होणाऱ्या या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बेळगावात दाखल होण्याची शक्यता असून प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta