
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात जनावरांच्या आरोग्याच्या बाबतीत सरकार आणि पशुसंवर्धन विभाग अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी आज आंदोलन छेडत विविध मागण्या मांडल्या. जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबे उपजीविकेसाठी पूर्णपणे पशुधनावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत विभागाचे दुर्लक्ष आणि सरकारच्या विलंब धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. बेळगावमधील शेतकरी या सरकारी धोरणांचा निषेध करत आहेत.
या संदर्भात बोलताना चुन्नप्पा पुजारी यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांच्या जबाबदारीतील कमतरतेमुळे यापूर्वी जिल्ह्यात एकूण ३१ काळवीट मृत्युमुखी पडले. या घटनेनंतरही सरकारने किंवा विभागाने कोणतीही योग्य चौकशी आणि कारवाई न केल्याने पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी संतापले आहेत. काळवीटांच्या मृत्यूनंतर आता जनावरांमध्ये ‘लाळ खुरकत’ रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत. या रोगामुळे जनावरांना खाणेपिणे कठीण होते, दुधाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी होते आणि काहीवेळा जनावरे दगावण्याची शक्यताही असते. “सरकारने तातडीने जागे होऊन जनावरांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू करावी,” अशी मागणी त्यांनी केली. “अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जनावरांना काही बाधा झाल्यास आणि त्यांचे मृत्यू झाल्यास, त्या कुटुंबांना सरकारने किमान ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी,” अशा शब्दांत त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली. शेतकरी समुदाय आणि पुरोगामी नेत्यांनी सरकार तसेच संबंधित विभागाने शेतकरी आणि त्यांच्या जनावरांच्या संरक्षणासाठी त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. यावेळी अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta