
बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेतर्फे सलग 14 वर्षी भव्य एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्नाटक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यामधील संघांची अभासी तत्वावर निवड करून दिग्गज संघांचा समावेश या आंतरराज्य स्पर्धेमध्ये करण्यात येणार आहे. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्सहन देण्यासाठी बेळगांव जिल्हा मर्यादित शालेय गटामध्ये देखील स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. चौखंदळ नाट्यरसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका पाहता यावी यासाठी गेल्या वर्षी पासून आभासी तत्वावर निवड करून स्पर्धेमध्ये संघाना प्रवेश देण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

नीटनेटकेपणा, नियोजनबध्द व्यवस्था व काटेकोर वेळेच्या नियोजनबरोबरच अनुभवी परीक्षक व पारदर्शकता, यामुळे स्पर्धेने नाट्य क्षेत्रात आपले एक वेगळे वलय निर्माण केले असून देशातील नामांकित स्पर्धांमध्ये या स्पर्धेचा उल्लेख केला जात आहे.
वैभवशाली नाट्य परंपरा लाभलेल्या बेळगांव परिसरात किमान पंधरा ते वीस वर्षापासून खंड पडलेल्या एकांकिका स्पर्धांना उर्जीत आवस्था प्राप्त करून देण्यासाठी गेली 13 वर्षे प्रामाणिकपणे संस्था कटिबध्द आहे. प्रदीर्घ काळ संस्थेने चालविलेल्या या नाट्य प्रपंच्यामुळे नाट्यरसिकांच्यामध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून, विविध राज्यातून कलाकारांनी सादर केलेल्या नाट्यअविष्करामुळे आंतरराज्य स्तरावर सांस्कृतिक देवाण घेवाणीस वाव मिळत आहे आणि यामुळेच, नवनविन कलाकार, लेखक, दिग्दर्शक निर्माण होण्याचा संस्थेचा उदात्त हेतू सफल होताना दिसत आहे.
बेळगांव परिसरातील नाट्य प्रपंचाला पुन:श उभारी देत शालेय गटातील स्पर्धेचे आयोजन अतिशय लाभदायक ठरत आहे. बेळगांव जिल्हा मर्यादित असलेल्या या स्पर्धेमध्ये अनेक स्थानिक शाळांनी सहभाग नोंदविला आहे. संस्थेने आपल्या संस्थेच्या अर्थकरणावर मजबूत पकड राखीत बेळगांव शहर व परिसरातील नाट्य प्रेमी रसिकांना सदर स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य चळवळ जपता येणार असून, दरवर्षीप्रमाणेच बेळगांवकर जनता व नाट्यप्रेमी रसिक या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देतील अशी अपेक्षा संस्था बाळगून आहे.
प्रवेश खुला
सर्वच प्रेक्षकांना सदर स्पर्धा ही विनामूल्य खुली ठेवण्यात आली असून केवळ शिस्तबद्ध आसन व्यवस्थेसाठी प्रेक्षकांनी एकांकिका सुरू असताना नाट्यगृहात प्रवेश करू नये असे संस्थेतर्फे असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा.डॉ. संध्या देशपांडे, प्रा. अरुणा नाईक, सुभाष सुंठणकर, निळूभाऊ नार्वेकर यांच्यासह सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta