Tuesday , March 3 2026
Breaking News

काकतीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; महिलेसह आठ जणांना चावा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील काकती गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने प्रचंड दहशत माजवली असून शाळेत मुलांना सोडायला गेलेल्या एका महिलेसह सात ते आठ जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे.

काकती गावातील शास्त्री नगर भागात आज सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर एकामागून एक हल्ले केले. मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या एका महिलेला कुत्र्याने लक्ष्य केले असता, तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या गल्लीतील अन्य ४-५ जणांनाही कुत्र्याने जखमी केले. या घटनेत एकूण ७ ते ८ जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचे थेट चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाल्याने महिला आणि मुलांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच समाजसेवक गजानन गव्हाणे आणि सुनीता गव्हाणे यांनी ग्रामपंचायत पिडीओ रेवती शिगंगे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पिडीओ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गजानन गव्हाणे व स्थानिक तरुणांच्या मदतीने पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद केले. काकती गावात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांचे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. यापूर्वी ग्रामपंचायत, वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदने देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप गजानन गव्हाणे यांनी केला आहे. वृद्ध आणि मुलांचे रक्षण करणे आता आव्हान बनले असून जिल्हा प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी गजानन गव्हाणे यांनी केली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी ग्रामपंचायतीने योग्य पावले उचलली असल्याचे रेवती शिगंगे यांनी म्हटले आहे. कुत्र्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *