फाटकवाडी धरणाच्या परिसरातील जवळपास ४० गावात भीतीचे वातावरण
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या फाटकवाडी मध्यम धरण प्रकल्पाला गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या गळतीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. सदरची पाणी गळती तातडीने थाबविणे गरजेचे आहे अन्यथा जवळपास चाळीस गावांना याचा धोका होवू शकतो. याची दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करावी अन्यता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे कार्यकर्ते नितीन फाटक यांच्यासह विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे अभियंता यांचेकडे निवेदनाद्वारे केला आहे.
चंदगड तालुक्यात फाटकवाडी येथे १.५५ टीएमसी क्षमतेचे धरण आहे. या धरणामुळे जवळपास ६९३७ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. तसेच या धरणामुळे ७० हजार लोक आणि २३ हजार पशुधन पिण्याच्या पाण्याचा लाभ घेतात. धरणातून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असलेने परिसरातील जवळपास ४० गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. धरणाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढणे, गळती, पाणी अडवण्याचा दुरावस्था यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. याबाबत अनेकवेळा पाटबंधारे विभागाला सुचना करूनही पाटबंधारे विभाग यांचेकडून वेळोवेळी दुर्लक्ष करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. येणाऱ्या पंधरा दिवसांत त्याच्यावर ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिष्टमंडळाने या निवेदनातून देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी भुदरगडमधील मेघोली हे धरण फुटल्याने जीवितहानी आणि पिकहानी झाली होती. अशीच परिस्थिती जर निर्माण झाली तर खूप भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. या धरणाच्या कार्यक्षेत्रातील फाटकवाडी, कानुर, कुरणी, हिंडगाव, सावर्डे, कानडी, पोवाचीवाडी, सातवणे, अडकुर, गणुचीवाडी आदी चाळीस गावातील मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि पिकहानी होऊ शकते. या भीतीने नागरिकांना जिव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे.
तर दुसरीकडे सदरची गळती ही धरणाच्या बांधकामातून होत नसून मेन गेटमधील दरवाज्याचे रबर सील खराब झाल्याने त्यातून पाणी गळती होत आहे. याची दुरुस्ती केल्यामुळे गळतीचे प्रमाण खूप कमी झाले असून यामधून कोणताही धोका उद्भवणार नाही, असे पाटबंधारे अभियंता तुषार पवार यांनी सांगितले.