तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या बावीस वर्षाचा कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरीचा दुष्काळ संपवून मानाची गदा पटकावल्याचा विशेष आनंद झाल्याची भावना महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या घरी कुस्तीची परंपरा असून त्याचबरोबर सैन्य दलातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मांडेदुर्ग (ता. चंदगड)चे कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेला प्रोत्साहन मिळाले आणि महाराष्ट्र केसरीची गदा पटकावण्यात यश मिळाले त्यामुळे त्यांचे विशेष आभार पै. पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी मानले.
चंदगड तालक्यातील मांडेदुर्गचे जुने जाणते माजी पैलवान मारुती पवार यांच्या घरी यावर्षीचे महाराष्ट्र केसरी विजेते पै. पृथ्वीराज पाटील व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी गोल्ड मेडल विजेते पै. सोनबा गोगाने व महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर यांचा सत्कार करण्यात आला. पै. पृथ्वीराज पाटील यांचे गुरू आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कोच राम पवार व त्यांचे बंधू लक्ष्मण पवार यांच्या हस्ते कौटुंबिक सत्कार सोहळा पार पडला. त्यानंतर मांडेदुर्ग ग्रामपंयत व गावकऱ्यांनी महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील, पै. विष्णू जोशीलकर, पै. सोनबा गोगाने, राम पवार, लक्ष्मण पवार यांची ट्रॅक्टरमधून ढोल ताशाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढून ग्रामपंचायत प्रांगणात सरपंच गणपत पवार व मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ झाला.
यावेळी प्रताप डसके, प्रा. सुहास पाटील, नेत्रपाल हडलगेकर (निट्टूर), लक्ष्मण भिंगुर्डे (तेऊरवाडी), व्ही. जे. पाटील, अरविंद धामणेकर, बाळू चौगुले, तानाची बोकडे तसेच गावातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटीलचे कोच राम पवार म्हणाले की, पृथ्वीराजने यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनेक दिग्गज पैलवानांना आसमान दाखवले आहे. यंदा राजर्षी शाहू महाराज यांचे शताब्दी महोत्सव वर्ष असून यंदा कोल्हापूरचा गेल्या 21 वर्षाचा महाराष्ट्र केसरी पदकाचा दुष्काळ संपवून पृथ्वीराज याने मिळवलेली मानाची गदा हे शाहू महाराजांचे आशीर्वादच आहेत. आता इथून पुढचं लक्ष 2024चे ऑलिम्पिक पदक जिंकणे हेच असून त्यासाठीची पृथ्वीराजची तयारी आणि प्रशिक्षण सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.