बेळगाव : बेळगावातील बिम्स इस्पितळाच्या बाबतीत वारंवार तक्रारी ऐकू येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शनिवारी अचानक बिम्सला भेट देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय सांगायचे असे हताश उद्गारही त्यांनी काढले.
बिम्स इस्पितळात कोरोना रुग्णांसह अन्य रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. मात्र रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार वारंवार ऐकू येत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शनिवारी अचानक बिम्सला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. पीपीई किट घालून त्यांनी कोरोना वार्डात प्रवेश करून रुग्णांशी संवाद साधत धीर दिला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून उपचारांबाबत माहिती घेऊन तेथील अव्यवस्थेविरुद्ध अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. बिम्सला भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, लोकांकडून तसेच वृत्तपत्रे, सोशल मीडियावरील बिम्सबाबतच्या तक्रारी पाहून पीपीई किट घालून बिम्सला भेट देऊन कोविड रुग्णांना धीर दिला. येथील गैरव्यवस्थेबाबत काय बोलायचे कळत नाही. बिम्सचे प्रशासन जाड कातडीचे आहे. यापूर्वी एकदा त्यांना इशारा दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर बिम्स अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मग काय ते सांगतो अशा शब्दांत त्यानी संताप व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प आदी अधिकारी उपस्थित होते.