नवी दिल्ली : केंद्र सरकारने ४०० रुपयांप्रमाणे कोव्हॅक्सिनचे डोज पंजाबला उपलब्ध करून दिले होते. परंतु, पंजाब सरकारने त्यांची २० खासगी रुग्णालयांना विक्री केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी इतरांना शहाणपणा शिकवू नये, असा टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लगावला.
पंजाब सरकारने कोरोना लसींसदर्भात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. यापूर्वी अकाली दलाच्या सुखबीरसिंग बादल यांनी देखील तसा आरोप केला होता. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील आता पंजाब सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.
केंद्र सरकारने पंजाबला १.४० लाखांपेक्षा जास्त कोव्हॅक्सिन या कोरोना लसीचे डोज उपलब्ध करून दिले होते. केंद्र सरकारने ४०० रुपयांच्या दराने हा लसपुरवठा केला होता. परंतु, पंजाब सरकारने त्या लसी नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यांनी राज्यातील २० खासगी रुग्णालयांना १ हजार रूपयांना एक डोस या दराने त्यांची विक्री केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास सोसावा लाग आहे, असे जावडेकर म्हणाले.
यावेळी जावडेकर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी आता तर इतरांना शहाणपणा शिकविण्याची सवय सोडण्याची गरज आहे. त्याऐवजी त्यांना आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात काय घडत आहे, त्याकडे लक्ष द्यावे. एकीकडे राहुल गांधी विनामूल्य लसीकरण करावे असे केंद्राला सांगतात आणि त्यांच्याच पक्षाचे सरकार विनामूल्य लसींची विक्री करते.
राज्यामध्ये कोरोनाचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे, मात्र काँग्रेस पक्ष अंतर्गत वादांमध्ये व्यस्त आहे. आतादेखील गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पंजाब सरकार आणि पंजाब काँग्रेस दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले आहे. त्यामुळे अंतर्गत राजकारणासाठी राज्यातील जनतेचा बळी देण्याचा प्रकार काँग्रेस करीत असल्याचेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.