कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत शिंपी यांची उपाध्यक्षपदी आज (सोमवार) बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीला यश आले. भाजपाने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती; मात्र ऐनवेळी माघार घेतली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आज सकाळी अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी जयवंत शिंपी यांचे नाव निश्चिच करण्यात आले होते. ऐनवेळ भाजपाने माघार घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी गेली महिनाभर हालचाली सुरू होत्या. काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्याच पक्षाचा अध्यक्ष होणार असा दावा केला होता. मात्र जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी मुलगा राहूल पाटीलसाठी हालचाली सुरू केल्या. काल रात्रीपासून दोन्ही मंत्री व आमदार पाटील यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. आज सकाळी पुन्हा एकदा चर्चा होऊन अखेर अध्यक्षपद राहुल पाटील यांना देण्यास दोन्ही मंत्र्यांनी संमती दर्शवली. तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पद देण्यात आले.