
खानापूर : दि. 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील व तज्ञ समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष धैर्यशील माने बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सीमावासीयांच्या अडचणी तसेच भावना जाणून घेणार आहेत. त्यांचा हा दौरा सीमाप्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यासाठी सीमावासीयांची एकजुटीने हा लढा आणखी तीव्र करूयात, असे आवाहन माजी तालुका पंचायत सभापती मारुती परमेकर यांनी केले आहे.
तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून ते बोलत होते. 1 डिसेंबर रोजी शिवस्मारकात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण हे होते.
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की, सीमा समन्वयक मंत्री बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. सीमावासीयांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. सध्याच्या राजकिय घडामोडी पाहता सीमाप्रश्नी लवकरात लवकर तोडगा निघेल व हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सभेचे अध्यक्ष पुंडलिक चव्हाण म्हणाले की, समन्वयक मंत्र्यांनी खानापूरला भेट द्यावी त्यासाठी तालुका समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मध्यवर्तीच्या नेत्यांशी चर्चा करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. विखुरलेली खानापूर तालुका म. ए. समिती मध्यवर्तीच्या पुढाकाराने एकत्रित आली आहे. तालुका म. ए. समितीची कार्यकारिणी पुनर्रचना करण्यासाठी प्रत्येक जिल्हापंचायत क्षेत्रातील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांकडे नावे जमा करण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी सूचना बैठकीचे अध्यक्ष पुंडलिक चव्हाण यांनी केली.
यावेळी रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, नारायण लाड, नारायण कापोलकर, अनिल पाटील, मुरलीधर पाटील, शिवाजी पाटील, प्रल्हाद मादार, रुक्माणा झुंझवाडकर, ईश्वर बोबाटे, प्रवीण पाटील, जयराम देसाई, प्रदीप पाटीलसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta