जांबोटी विभागात समितीच्या वतीने जनजागृती
खानापूर : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार जांबोटी भागातील समिती कार्यकर्त्यांनी केला.
खानापूर तालुका म. ए. समिती नूतन कार्यकारिणी निवड करण्यासाठी व महामेळाव्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मध्यवर्तीने नियुक्त केलेल्या आठ सदस्यीय कमिटी व तालुक्यातील समिती कार्यकर्ते व नेत्यांनी आज जांबोटी विभागाचा दौरा केला. यावेळी जांबोटी येथील राम मंदिरात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समिती नेते विलास बेळगावकर हे होते. यावेळी जांबोटी भागातील बाबुराव भरणकर, जयराम देसाई, मारुतीराव परमेकर, रवींद्र शिंदे, दत्तात्रय देसाई, शंकर सडेकर, दिगंबर पाटील, नारायण कापोलकर, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, यशवंतराव बिर्जे, वसंतराव नावलकर, गोपाळ देसाई इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
विलासराव बेळगावकर म्हणाले की, 2006 पासून कर्नाटक सरकार बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन भरवते व त्याला विरोध म्हणून म. ए. समितीकडून मराठी भाषिकांचा मेळावा भरविला जातो. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जांबोटी भागातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करत “चलो बेळगाव” असा नारा यावेळी देण्यात आला.
त्यानंतर जांबोटी बाजारपेठेत पत्रके वाटून महामेळाव्याची जनजागृती करण्यात आली तसेच या बैठकीत म. ए. समितीच्या कार्यकरिणीवर कार्य करण्यासाठी इच्छुकांची नावे जांबोटी भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच समितीप्रेमी नागरिकांशी चर्चा करून सोमवारपर्यंत देऊ तसेच नूतन कार्यकारिणी निर्माण झाल्यानंतर जांबोटी विभागात समितीचा महामेळावा घेऊ, असे विलास बेळगावकर यांनी सांगितले.
यावेळी समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.