खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीची एकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नूतन पदाधिकारी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 फेब्रुवारी रोजी म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात जनजागृती दौऱ्याची सुरूवात कणकुंबी येथील माऊली देवीच्या पुजनाने करण्यात आली.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची जनजागृती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कणकुंबी येथे प्रयाण करण्यात आले. कणकुंबी येथील माऊली देवीच्या पूजनानंतर शंकर पाटील, पुंडलिक चव्हाण, नारायण लाड यांच्या हस्ते म. ए. समितीच्या देणगी पुस्तकांचे पूजन करण्यात आले. म. ए. समितीला शिवोली गावचे ग्रामस्थ मुकुंद तुकाराम पाटील यांनी 5000 रु. पहिली देणगी दिली. माजी आमदार दिगंबर पाटील यांनी 5000 रु. तर माऊली मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष राजाराम गावडे यांनी 500 रु. देणगी देऊ केली.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, माजी सभापती मारुतीराव परमेकर, ज्येष्ठ सीमासत्याग्रही शंकरराव पाटील, पुंडलीकराव चव्हाण, नारायणराव लाड, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सचिव सीताराम बेडरे, जांबोटी विभाग प्रमुख माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, लोंढा विभाग प्रमुख कृष्णा मनोळकर, नंदगड विभाग प्रमुख अर्जुन देसाई, गर्लगुंजी विभाग प्रमुख कृष्णा कुंभार, खानापूर शहर प्रमुख मारुती गुरव, समिती नेते आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, गोपाळराव पाटील, पांडुरंग सावंत, प्रकाश चव्हाण, बाळासाहेब शेलार, अनंत गुरव, ब्रम्हानंद पाटील, वसंत नावलकर रवी शिंदे यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta