खानापूर : सत्तेत असताना खानापूर तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेल्या काँग्रेस, जेडीएसने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून यात्रेच्या नावाखाली जनतेशी संपर्क करू पाहत आहेत, असा आरोप खानापूर मतदारसंघातील संभाव्य भाजपा उमेदवार व ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे.
काँग्रेस आमदारांनी आपल्या कार्यकाळात खानापूर तालुक्याचा कोणताच विकास केलेला नाही व आता मात्र घरोघरी जाऊन विकास कामाचा प्रचार करताना दिसत आहेत. काँग्रेस नेत्यांनी “भारत जोडो” यात्रेत कितीही मजल मारली असली तरीही त्यांनी फक्त राहुल गांधींची दाढीच वाढविली आहे. पक्ष वाढीस या यात्रेचा काहीही फायदा झालेला नाही मग आता इथे प्रवास करून काय साध्य होणार आहे?
जनतेच्या अडचणी सोडविण्यास असमर्थ असणाऱ्यांनी आता यात्रा काढून काय साध्य करणार आहेत, असा सवाल डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे.
काँग्रेसने आपल्या चिन्हातील हाताच्या रेषा बदलल्या आहेत. मग आता आपल्या तळहाताच्या रेषा बदलून काही साध्य होणार आहे? त्यांचे नशीब त्यांची साथ सोडत आहे. आपल्या कार्यकाळात आपल्या मतदारसंघातील समस्या सोडविल्या असत्या तर आज मतदार आणि नशीब दोन्हीही त्यांच्या सोबत असते, असा टोला देखील त्यांनी लागवला आहे.
खानापूरच्या जनतेने किती कामे केली आहेत हे जनतेने पाहिले आहे. लोंढा गावात कोविड 19 आणि पावसाळ्यात लोकांना त्रास होत असताना जनतेच्या मदतीसाठी कोण उभे होते हे सर्वांना ज्ञात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना योग्य ते उत्तर देईल. केवळ कामाचा दिखाऊपणा करणे आणि जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्या सोडविणे यात फरक आहे. अडचणीच्या काळात जनतेच्या जवळ न जाणाऱ्या आमदारांना यावेळी जनताच दूर ठेवेल यात शंकाच नाही, असे देखील डॉ.सरनोबत म्हणाल्या.
जेडीएसने आता लिंगनमठ गावातून पंचरत्न यात्रा चालू केली आहे. खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे जेडीएस नेते आता लोकांमध्ये जातीचे विष परत आहेत. ब्राह्मण, लिंगायत व इतर जातीमध्ये जातीवादाची ठिणगी टाकल्याशिवाय त्यांचे जेवण पचणार नाही पण जनता या अश्या संधीसाधू नेत्यांना ओळखून आहे, असे डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या.
एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना त्यांनी म्हादाई प्रश्न सोडवण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. आता भाजपने गोवा आणि कर्नाटक सरकारला विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडविला आहे. सत्ताधाऱ्यांवर नुसती टीका न करता जनतेच्या समस्या सोडवून मते मागण्यात नैतिकता असते. हे जेडीएस व काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असे देखील डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या.