खानापूर : सर्वसामान्यांचा वाढता पाठिंबा विकासाभिमुख कामांचे फळ आहे. विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. पूर्व भागासह तालुक्याच्या परिवर्तनासाठी केलेल्या कार्याच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे. पाच वर्षाचे विकासाचे पर्व अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसच्या हाताला साथ द्या, असे आवाहन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.
पूर्व भागातील हंदूर, हुलीकोत्तल, सुरपूर-केरवाड या भागात सोमवारी आमदार डॉ. निंबाळकर यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, देगाव पाणी योजनेमुळे संपूर्ण तालुका पाणीटंचाई मुक्त होईल. इटगी, हिरेमुनोळी, मुगळीहाळ या उपसा जलसिंचन योजनांमुळे हजारो एकर शेत जमीन ओलिताखाली आली आहे. जनतेने या कामगिरीची दखल घेऊन पुन्हा सेवेची संधी द्यावी.
‘जागोजागी त्यांनी कोपरा सभा घेऊन गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली. तालुक्यातील जनतेला समस्यामुक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. तिन्ही गावातून पदयात्रा काढून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
Belgaum Varta Belgaum Varta