खानापूर : खानापूर तालुका म्हणजे अतिजंगलाने व्यापलेला तालुका, त्यातच मुसळधार पावसाचा तालुका. त्यामुळे तालुक्याच्या जंगल भागाच्या खेड्यातील लोकांचे जीवनमान खुप कष्टाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरी सुध्दा खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, गावच्या नागरिकांना अजुनही रस्ता नाही. पावसाळ्यात नदी, नाल्यातून येण्यासाठी पुल नाही. पावसाळा आला की या भागातील नागरिकांना आडी तयार करून नदी, नाले पार करून खानापूर तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.
यांच्या नशीबी चांगला रस्ता नाही, कधी बसचे दर्शन नाही. पावसाळा सुरू झाला की, नदी, नाले तुडूंब भरून वाहतात. त्यामुळे पास्टोली, गवाळी नागरिकांच्या नशीबी संपर्क तुटतो. आजारी पडलेल्या रुग्णाना जिवंतपणी तिरडी करून दवाखान्यात आणले जाते. महिलेच्या नशीबी बाळंतपण म्हणजे पुर्नजन्मच. गरोदर महिलेला पावसाळ्यात चौघाच्या खांद्यावर बसुन नदी, नाले पार करून तालुक्याच्या ठिकाणी डाॅक्टरकडे आणले जाते.
हा वनवास या भागातील जनतेला चुकला नाही.
आतापर्यंत अनेक आमदार झाले मात्र गवाळी, पास्टोली गावाच्या नागरिकांना आडीचा प्रवास कधी चुकला नाही. आताचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर तरी पास्टोली, गवाळी नागरिकांच्या समस्या सोडवतील का? असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta