खानापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय ठेवून समोर जाणे गरजेचे असून तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून स्वावलंबी बनले पाहिजे असे प्रतिपादन एल. आय. देसाई यांनी केले आहे.
हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि स्नेह संमेलन कार्यक्रम गुरूवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. ईश्वर मुचंडी होते. यावेळी प्रमूख वक्ते देसाई यांनी विद्यार्थांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक असून प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. विद्यार्थांनी आपले क्षेत्र स्वतः निवडावी तसेच विद्यार्थांनी सातत्याने वाचणे आवश्यक आहे. आधुनिक काळातील विद्यार्थांना मोबाईलचे व्यसन लागले आहे मात्र विद्यार्थांनी मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करावा तंत्रज्ञानाचे महत्व समजून घेतले पाहिजे मात्र सोशल मीडियाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि दिप प्रज्वलन करण्यात आले. एम. वाय. बेळगावकर, शहापूर येथील गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास घाडी, डॉ. रफिक खानापुरी आदींनी मनोगत व्यक्त केले. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत हलशी केंद्रात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या तसेच आदर्श विद्यार्थी मोहन देसाई व आदर्श विद्यार्थिनी अस्मिता देसाई यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हलशी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष पांडुरंग बावकर, बी. डी. कुडची, उपाध्यक्ष अश्विनी देसाई, मिलिंद देसाई, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नागाप्पा देसाई, अर्जुन देसाई, सीआरपी एस. एल. चापगावकर, प्रवीण गावडा, अर्जुन देसाई, कल्लाप्पा पाटील, हलशी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. माळवी, नारायण पाटील, मल्लू पाटील आदि उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक किरण देसाई यांनी प्रास्तविक केले तर प्रियांका काकतकर सूत्र संचालन केले.