कारवार : देशाला संकटमुक्त करायचे असल्यास देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. मागील दहा वर्षापासून आपला देश संकटात सापडला आहे. देशात महागाईने कहर माजविला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दैनंदिन गरजा भागविणे देखील अशक्य झाले आहे, असे प्रतिपादन कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले. त्या गुरुवारी नंदनगद्दी कारवार येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होत्या.
मोदी सरकारला सर्वसामान्य गरीब जनतेची काळजी नाही. देशातील गरीब जनतेचा पैसा वापरून अदानी, अंबानी यांनाच श्रीमंत करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून केले जात आहेत. देशातील तरुणवर्गाला व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्नही सरकार करीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षात गोरगरिबांसाठी एखादी तरी कल्याणकारी योजना राबविली आहे का असा प्रश्न उपस्थित करून निंबाळकर म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी रेडिओच्या माध्यमातून मन की बात करण्याऐवजी जनतेत जाऊन जनतेची सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केला आहे का असा प्रश्न देखील यावेळी अंजलीताई निंबाळकर यांनी उपस्थित केला.
राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. दुष्काळाच्या झळा सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना तसेच मुक्या जनावरांना देखील सहन कराव्या लागत आहेत. मात्र मोदींनी दुष्काळावर भाष्य केलेले नाही. भाजपला जाहिरातबाजीची फार मोठी हाऊस आहे. जनतेच्या समस्यांशी त्यांचे काहीही देणे घेणे नाही. कारवार मतदार संघातील भाजप उमेदवार स्वतःला नाही तर मोदींना मतदान करा असे आवाहन करीत आहेत. सहा वेळा आमदार, एकदा मंत्रीपद, विधानसभा अध्यक्ष अशी पदे भूषवलेले विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या तुलनेत आपण लहान आहोत तथापि विकासाच्याबाबतीत आपण हेगडे यांच्या तुलनेत एक पाऊल पुढे असल्याचा दावा यावेळी अंजलीताई निंबाळकर यांनी केला.
कारवार अंकोलाचे आमदार सतीश सैल म्हणाले की, भाजप हे नेहमी जातीधर्मावर राजकारण करीत असते. भाजप नेत्यांच्या तोंडात जात, धर्म या पलीकडे एक शब्द देखील येत नाही. केंद्रात मागील 10 वर्षापासून भाजपची सत्ता होती. या काळात गरिबांचे शोषण, शेतकऱ्यांवर दडपण, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, महिलांवर होणारे सातत्याचे अत्याचार प्रकरणे सुरू आहेत. गरीब आणि सामान्य जनतेचा विचार करायला भाजपला वेळ देखील नाही. त्यांच्याकडे फक्त अदानी, अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींची कर्ज माफ करून भाजपकडे त्यांना श्रीमंत आणि धनिक करण्यास वेळ आहे. 2014 मध्ये भाजपच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून मतदान केलेल्या देशवासीयांच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे. यावेळी काँग्रेसला मतदान करून खोटी आश्वासने देत सत्तेवर येणाऱ्या भाजपला जनतेने चांगलाच धडा शिकवावा असे आवाहन यांनी यावेळी केले.
यावेळी समीर नाईक, शंभू शेट्टी, हरीश सांडेकर, लिलाबाई ठाणेकर, विनायक सांगेकर, सलीम शेख आदी उपस्थित होते. प्रचार सभेत सहभागी होण्यापूर्वी डॉ. निंबाळकर यांनी नंदनगद्दी येथील ग्रामदैवत नागनाथ देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.