खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेमध्ये एस्.डी.एम्.सी. व पालक मेळावा सोमवार दि. २४ रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती एस. वाय. सोनार होत्या.
कार्यक्रमाला शाळा सु़धारणा समितीचे सदस्य आणि पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकांचे स्वागत करून सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचे सहशिक्षक आणि तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय्. एम्. पाटील यांनी शाळेच्या अभिवृद्धीसाठी पालकांच्या भूमिकेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांनी एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे असल्याबाबत विचार मांडले. संपन्मूल व्यक्ती म्हणून. एस्. एल्. हळदणकर, एम्. एम्. सालगुडी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी करून दर्जेदार शिक्षण देणे, शाळेची भौतिक आणि शैक्षणिक प्रगती, गुणवत्तापूर्ण शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व सहशिक्षकांच्या सहकार्याने पालकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संगीत खुर्ची, डोक्यावर वही घेऊन धावणे, लिंबू चमचा, स्मरण खेळ यांसह कृतींमध्ये पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. या खेळाद्वारे शाळेत विद्यार्थी कसे शिकत असतात याची अनुभूती पालकांनी घेतली. विजेत्या स्पर्धकांसह सर्वच सहभागी पालकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आभार वाय. एम. पाटील यांनी मानले.