खानापूर : खानापूर तालुक्यातील झाडनावगे गावाजवळील नाल्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या सुदाम शामराव गावडे (वय ४९) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी त्यांचा मृतदेह नाल्यात आढळून आला.
गुरुवारी सुदाम गावडे मासे पकडण्यासाठी गेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. शुक्रवारी पहाटे एका गावकऱ्याला पाण्यात काहीतरी पडल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिल्यावर तो मृतदेह सुदाम गावडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
ही बातमी गावात पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर झाडनावगे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta