
खानापूर : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. परमपूज्य वेदांताचार्य मराठा जगद्गुरू श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी, गोसाई मठ, भवानी पीठ, गविपूरम (बेंगलोर) यांच्या दिव्य सान्निध्यात चिंतन बैठक आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 3.30 वाजता, खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या हरे कृष्ण जगन्नाथ मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात तयारी व नियोजन करण्यासाठी रविवारी मराठा समाजातील प्रमुख मंडळींची बैठक बांधकाम विभागाच्या विश्रामधामात संपन्न झाली. यावेळी मराठा समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, पंडित ओगले, संजय कुबल, आबासाहेब दळवी, बाळाराम सावंत, विनायक मुतगेकर, सूर्यकांत कुलकर्णी, नागेंद्र चौगुला व आदीजण उपस्थित होते.
या बैठकीस तालुक्यातील मराठा समाजाचे विद्यमान आमदार, माजी आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, तालुका पंचायत सदस्य तसेच सर्व मराठा समाजाचे पदाधिकारी व नेते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याने समाजबांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असेही सांगण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta