खानापूर : गणेबैल टोल प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज बेळगाव येथील एसी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस एसी श्रवण नाईक, एनएचएआयचे प्रोजेक्ट डायरेक्टर भुवनेश कुमार शुक्ला, काँग्रेस नेते प्रसाद पाटील, टोल कर्मचाऱ्यांचे वकील आदी उपस्थित होते.
यापूर्वीच डीसी व एसपी यांची भेट घेऊन टोल कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर आज एसी कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत सखोल चर्चा करून टोल चालवणाऱ्या हुळे कंपनीला प्रश्नावर तोडगा काढून टोल सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. दोन्ही बाजूंनी समन्वयाने मार्ग काढण्याचा सल्लाही देण्यात आला. मात्र, टोल चालक कंपनीच्या प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संबंधित कंपनीचा करार (टर्मिनेशन) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रसाद पाटील यांनी दिली.
दरम्यान, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी लवकरच नवीन टेंडर प्रक्रिया राबवून नवीन कंपनीकडे टोल संचालन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तोपर्यंत टोल व्यवस्था ऑटोमॅटिक पद्धतीने (ऑटो मोड) सुरू ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, स्थानिक भूमिपुत्र टोल कर्मचाऱ्यांना नवीन कंपनीमार्फत पुन्हा नोकरीत सामावून घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने या प्रकरणात टोल कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. तालुक्यात कोणावरही अन्याय झाल्यास त्याविरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर तालुक्यातील भाजप नेते व संबंधित संघटना गप्प असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. सुमारे 40 युवक-युवतींच्या नोकऱ्या धोक्यात असतानाही कोणतीही भूमिका न घेणे हे आश्चर्यकारक असल्याचे नमूद करण्यात आले.
गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांना टोलमुक्तीचा सरसकट लाभ मिळत असून, यापूर्वी केवळ ठराविक व्यक्तींनाच मिळणारा हा लाभ आता सर्वसामान्यांना मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta